मुंबई: राज्यात हनुमान चालीसा आणि भोंगा वादानंतर आता अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे. बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यावर शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.
'...तेव्हा तुम्ही रांगत होता'आदित्य यांनी केलेल्या टीकेवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. "आयत्या पिठावर रेघोट्या" या मथळ्याखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात, "आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी, या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरुन तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय," अशी टीका उपाध्ये यांनी या पोस्टमधून केलीय.
'जरा आत्मपरीक्षण करा'ते पुढे म्हणतात की "बाकी राम मंदिरासाठी भाजपाने आपली उत्तर प्रदेशसह काही राज्यातील सरकारे पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा," असा सल्लाही उपाध्ये यांनी दिलाय.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅनटीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाले होते की, 1857च्या लढ्यात देवेंद्र फडणवीसांचं खूप योगदान आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तसेच आता राज्यासमोर महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे, असही आदित्य ठाकरे म्हणाले होते.