मुंबई : जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन राज्य सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला दिली असल्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर 'भूखंडाचे श्रीखंड' हा शब्दप्रयोग शरद पवारांमुळेच महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मिळाला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यात 51 हेक्टर शासकीय जमीन वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला देण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे 10 कोटी रुपये किमंत असल्याचे बोलले जात आहे. तर विशेष बाब म्हणून अल्पदरात ही जमीन संबधित संस्थेला देण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकारवर टीका सुद्धा केली आहे. तर याचवेळी शरद पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे.
एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना माधव भंडारी म्हणाले की, वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला अगदी कमी दरात जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले असल्याचा हा थेट पुरावा आहे. ज्या-ज्या वेळी शरद पवार सत्तेत आले, त्यांनी त्या-त्या वेळी आपल्या संस्थाना,आपल्या जवळच्या आणि आसपासच्या लोकांना शासकीय जमिनींची खिरापत वाटली. आता पुन्हा तेच उद्योग सुरु झाले असल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे.