भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:07 PM2024-09-05T13:07:20+5:302024-09-05T13:08:43+5:30

महायुतीत भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षातून ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. 

BJP state president Chandrasekhar Bawankule last warning to party leaders, Do not talk on Mahayuti leaders like Ajit Pawar, Eknath Shinde | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिल्याचं समोर आले आहे. संघाने अजित पवारांसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर भाजपातील काही नेते उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत होते. त्यावर बावनकुळेंनी नेते, कार्यकर्त्यांना समज दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपा कुठल्याही नेत्यांनी अवाजवी बोलू नये. केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे. खालीही ती स्वीकारावीच लागेल. मी शेवटची वॉर्निंग दिली आहे. यापुढे कुणीही महायुतीतील नेत्यांबद्दल बोलायचं नाही. महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदींसोबत काम करण्यासाठी आहे. कुणीही भाजपा कार्यकर्ता यापुढे महायुतीच्या नेत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

अलीकडेच भाजपा खासदाराच्या पराभवासाठी जबाबदार धरत भाजपा नेते गणेश हाके यांनी अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग असा संग घडला आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेच्या युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी काय काम केलं का, तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केल्याचा आरोप हाकेंनी केला होता. 

पुण्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

पुण्यातील वडगाव शेरी इथं विकासकामांच्या भूमिपूजनावरून भाजपा नेते जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचा धर्म काय फक्त भाजपा-शिवसेनेनीच पाळायचा का असा सवाल केला होता. महायुतीचा धर्म पाळणं ही प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे. परंतु वडगाव शेरीच्या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय अशी टीका त्यांनी केली होती. 
 
तर जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आले असताना तिथे भाजपा नेत्या आशा बुचके यांनी कार्यकर्त्यांसह अजित पवारांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. जुन्नरमधील पर्यटनावर बैठक असताना त्याठिकाणी महायुतीच्या नेत्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत आशा बुचके यांनी अजित पवार आणि स्थानिक राष्ट्रवादी आमदारावर टीका केली होती. त्यामुळे भाजपा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

Web Title: BJP state president Chandrasekhar Bawankule last warning to party leaders, Do not talk on Mahayuti leaders like Ajit Pawar, Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.