मुंबई - महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे. त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं विधान केल्याने त्यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. तर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असा उल्लेख केल्याने हा वादा आणखी पेटला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनहीभाजपावर जोरदार पलटवार करण्यात आला असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा औरंगजेब याचा आदरार्थी उल्लेख करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगजेब बादशाहचा उल्लेख औरंगजेबजी असा करताना दिसत आहेत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात की, ‘’क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?’’ असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर आपण ठाम असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.