मुंबई - मालेगावच्या सभेत डरकाळी फोडल्यावर आम्हाला वाटले उद्धव ठाकरे घरी येतील, राहुल गांधींच्या फोटोला चपलेने मारतील आणि दाखवतील. पण सकाळी ९ चा भोंगा वाजला. आम्ही राहुल गांधींशी बोलू, ३ वर्षात ५ वेळा सावरकरांचा अपमान केला तेव्हा का बोलले नाहीत. किती दिवस महाराष्ट्राने सावरकरांचा अपमान सहन करायचा असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपा-शिवसेना म्हणून युतीने प्रत्येक विधानसभेत, जिल्ह्यात ५०० वीर सावरकर गौरव यात्रा काढायची. युवा पिढीला सावरकरांचा इतिहास माहिती होईल त्यानंतर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही यासाठी आम्ही यात्रा काढणार आहोत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या ३ वर्षापासून राहुल गांधी अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत अपमानास्पद टिप्पणी करायला लागले. रत्नागिरीत सावरकरांना ज्या जेलमध्ये बंद केले, अंदमानात गेले तेथील जेल पाहिले तर आजही अस्वस्थ व्हायला लागते. १४ वर्षे इंग्रजांविरोधात जेलमध्ये राहणे या इतिहासाला राहुल गांधी मान्य करत नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच दुसरीकडे स्व. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यरच्या प्रतिमेला जोडे मारले होते. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही पण काँग्रेससोबत राहू अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. सावरकरांचा अपमान झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी सातत्याने सावरकरांचा अपमान करतायेत. सावरकरांचा इतिहास दाबून टाकायचा हे राहुल गांधीचे काम आहे असा आरोप बावनकुळेंनी केला. लोकमत ऑनलाईनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
पाहा व्हिडिओ -
दरम्यान, सावरकरांचा खरा इतिहास डोळ्यात अश्रू आणणारा आहे. हा लोकांसमोर आणला पाहिजे. वीर सावरकर स्वातंत्र्याकरिता इंग्रजाविरोधात लढले. संपूर्ण आयुष्य वेचले. महाराष्ट्रातील कुठलीही जनता सावरकरांवर आक्षेप घेणार नाही. राज्यातील जनतेचे मूळ आम्हाला माहिती आहे. ही जनता स्वातंत्र्यवीरांच्या पाठिशी आहे. ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातील त्याच्याविरोधात आम्ही राहू असं बावनकुळे म्हणाले.