राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. मी त्यांच्यासाठी वापरलेले फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले. आता फडणवीस यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असून महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न पडावा असं कालचं त्यांचं वक्तव्य होतं," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग‘ केल्यानंतर असेच होणार, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’-
मी मुख्यमंत्री असताना ज्या वेळी पोलिसांवर आरोप झाले, त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो होतो. जेवढे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्यावर एक दबाव आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यातून ह्या हत्या होत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ‘भाजप में आओ, सब भूल जाओ‘ ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’ आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलले की, श्वान गाडी खाला आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलवतात अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.