'आमदार, खासदार अन् मुख्यमंत्रीही चोरले', नागपुरमधून मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:47 PM2024-04-14T19:47:51+5:302024-04-14T19:48:39+5:30
'या निवडणुकीत देशातील जनता भाजपला सत्तेतून हद्दपार करेल.'
Lok Sabha Election 2024- लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे, त्यामुळे सर्वच पक्षातील प्रमुख नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. अशातच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आज नागपुरात सभा घेतली यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) भ्रष्टाचार आणि पक्ष फोडीवरुन जोरदार निशाणा साधला.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 23 विरोधी नेते आमच्यासोबत होते तोपर्यंत भ्रष्ट होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी त्या 23 नेत्यांना धमकावून आपल्या पक्षात घेतले. आधी जे भ्रष्ट आणि चोर होते, ज्यांना तुम्ही चोर म्हणत होता, तेच आज तुमच्या मांडीला मांडी लावून काम करत आहेत. विरोधी पक्षात असतात तेव्हा भ्रष्टाचारी आणि भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाताच स्वच्छ होतात. तुम्ही आमदार, खासदार अन् आमचे मुख्यमंत्रीही चोरले...' अशी बोचरी टीका खरगेंनी केली.
LIVE: Congress President Shri @kharge addresses the public in Nagpur, Maharashtra for the 2024 Lok Sabha campaign. https://t.co/B5E3g2zNkf
— Congress (@INCIndia) April 14, 2024
यावेळी खरगेंनी 'मोदी की गॅरंटी'वरही निशाणा साधला. ते म्हणाले, 'पीएम मोदींनी त्यांची एकही गॅरंटी पूर्ण केली नाही, फक्त आपल्या मोठ-मोठ्या वक्तव्यांनी जनतेची फसवणूक केली. मोदींनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, परदेशातून काळा पैसा आणणार होते, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. पण, या आश्वासनांपैकी एकही काम पूर्ण झाले नाही.'
'देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने लढा दिला, बलिदान दिले. आरएसएसचे लोक इंग्रजांसाठी काम करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात देशाचा तिरंगा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही लावत नाहीत. बाबासाहेब म्हणायचे शिक्षा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र फक्त भारतीय राज्यघटनाच पुढे नेऊ शकते. हीच राज्यघटना वाचवण्यासाठी आपण लढत आहोत. आमची लढाई मोदी आणि भाजपविरोधात नसून, या देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आहे. सर्वांना समान जागा मिळावी, सर्वांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. आता जनता जागृत झाली आहे. या अन्यायाला पराभूत करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. या निवडणुकीत भाजपला सत्तेतून हद्दपार करेल,' असा दावाही खरगेंनी केला.