Maharashtra Politics: आमदार अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी सुनावणीला विलंब लागण्याची शक्यता कायदेतज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाने स्वतंत्र सुनावणीची मागणी केली आहे. तसे झाल्यास प्रत्येक याचिकेवर आमदारांची सुनावणी होईल आणि अपात्रतेचा निकाल अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे. यातच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाही, असा दावा केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा नैसर्गिक अधिकार डावलू शकत नसल्याचे मत स्पष्ट केले आहे. आता पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी आहे. या सुनावणीत केवळ एकत्र सुनावणी घ्यायची की नाही, हेच निश्चित होईल. हिवाळी अधिवेशनामुळे डिसेंबरमध्ये सुनावणी होणे शक्य नाही. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच सुनावणी सुरू होऊन निकाल लागण्यास मार्च उजाडेल आणि त्यावेळी लोकसभा निवडणुकांची धांदल सुरू झालेली असेल, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. यानंतर आता भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत, असा दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत
आपल्याला माहिती आहे की, एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. त्यामुळे ते अपात्र होऊ शकत नाहीत. भाजपने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. संख्येच्या आधारावर विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदार गेले आहेत. संख्या मोठी असल्याने ते अपात्र होऊ शकत नाहीत. आमदार अपात्र होण्यासाठी विधानसभेत व्हिप काढावा लागतो. प्रतोदने व्हिप काढला आणि त्या व्हिपचे उल्लंघन केले तर पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संबंधित आमदार अपात्र होऊ शकतात, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपल्याकडे कोणत्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे असावी? पक्षाचा प्रमुख कोण? त्या पक्षाचे चिन्ह कुणाकडे असावे? याचा निर्णय संविधानानुसार निवडणूक आयोग घेत असतो. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह मिळाले आहे. पक्ष प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. त्यामुळे व्यक्तिगत कुणी विचारले तर शिंदे गटाकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही, ज्यामुळे तुम्ही त्यांना अपात्र करू शकाल, हे वैयक्तिक मत आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.