Maharashtra Politics: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव टाळून यापुढे इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भर देणार असून दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन शिवसेनेच्या राजकारणासाठी सावरकर किती महत्त्वाचे आहेत, तसेच सद्य:स्थितीत सावरकरांचा मुद्दा सोडून आजचे मुद्दे घेऊन मोदी सरकारशी लढावे लागणार आहे, हे निदर्शनास आणून दिले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधींना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने भाजप आणि महाविकास आघाडीचे आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण प्रचंड तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांना दिला होता. त्यानंतर त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हानही दिले. यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी राहुल गांधी यांना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. आम्हाला आमची श्रद्धास्थाने खुर्चीपेक्षा महत्वाची आहेत. भविष्यात जर काँग्रेसने ही चूक सुधारली नाही तर जनता आगामी काळात त्यांची चूक नक्की सुधारेल, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी सावरकर’ असे नवे पोस्टर आणले आणि ते आपल्या सोशल मीडियावरही ठेवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘आम्ही सारे सावरकर’ असे पोस्टर सोशल मीडियावर झळकवले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"