लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या सरकारचा जन्मच बेईमानी करून झाला आहे. ओबीसींवर राजकीय अत्याचार करणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध भाजपने एल्गार पुकारला आहे, अशी माहिती भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बुधवारी पत्रपरिषदेत दिली. या अंतर्गत येत्या २६ जून रोजी भाजपने चक्का जाम आंदोलन केले असून या आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आघाडी सरकारचा जन्मच बेईमानीने झाला. कुंभकर्ण हा सहा महिने झोपायचा पण हे सरकार बारा महिनेही झोपलेलेच असते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून पावसाळी अधिवेशनाचा कालावधीही दोन दिवसांचा केला. तीन पक्षाचे सरकार म्हणून तीन दिवसाचे अधिवेशन ठेवले असते, तरी समजले असते, पण हे सरकार कॉंग्रेसला काही समजताच नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. पत्रपरिषदेला खा. विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपदर, माजी आमदार डॉ मिलिंद माने, धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.
भाजप सर्व जागी ओबीसी उमेदवार देणार
ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने १९ जुलै रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकावर स्थगिती आणावी. यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी भाजपची भूमिका आहे. जर या निवडणुका स्थगित झाल्या नाही तर या निवडणुकीतील सर्व जागी भाजपतर्फे ओबीसी उमेदवार उभे केले जातील, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले.