Sudhir Mungantiwar News: राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव केला असून प्रमुख पक्षातील अनेक आजी-माजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय राजकारणात आणला असून विविध राज्यांत तो पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. हैदराबाद महापालिकेत भाजप ३ वरून ५० पर्यंत मजल मारू शकला. राष्ट्रभक्त-देशभक्त मतदार तुष्टीकरणाची नीती चालू देणार नाही. बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे. पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
स्वप्न पाहण्याला कुठलीही मनाई नाही
महाराष्ट्रात सध्या दहाहून अधिक मुख्यमंत्री स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. दहाच काय राज्यात शंभर मुख्यमंत्री असावेत. स्वप्न पाहण्याला घटनेत कुठलीही मनाई नाही. मात्र या सर्व भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनात काय आहे हे बॅनरद्वारे सांगावे. यासोबतच या सर्वांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण करावे हे महत्त्वाचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य
उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांनी हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले आहे. देश असो वा राज्य उद्धव ठाकरे यांची अवस्था दारुण झाली आहे, अशी बोचरी टीका करत, विरोधकांची पाटणा येथील एकजुटीची बैठक म्हणजे कुठलाही विचार नसलेली गोष्ट आहे. ही बैठक म्हणजे इंजिन विना गाडी आणि आत्म्या विना शरीर असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि जगात देशाचा गौरव वाढवत आहेत. मात्र पाटण्यातील सर्व विरोधकांना स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने ते एकत्र आले आहेत, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.