Maharashtra Politics: आताच्या घडीला सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसह त्यापूर्वी राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने सर्वच निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप युतीत आगामी निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आमदार अपात्रतेची याचिका आणि निवडणूक चिन्हाच्या प्रलंबित प्रश्नामुळे शिंदे गट कोणत्या निवडणूक चिन्हावर निवडणुका लढवणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेवर दावा करत धनुष्यबाण चिन्ह आपलेच असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निकाल दिलेला नाही. मात्र, आगामी काळातील निवडणुका पाहता शिंदे गट कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत राज्याचे मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आले. शिंदे गट आगामी काळातील निवडणुका भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार का, यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केले आहे.
शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढवणार?
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात निर्णय काय होते ते बघू, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना, काँग्रेसच्या प्रवक्त्याला काही माहिती नाही. काँग्रेस आता भारत जोडो आंदोलन करत आहे. हे भारत तोडो आहे, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार काँग्रेसवर निशाणा साधला. याशिवाय, शिखांचा तिरस्कार कुणी केला? आता केरळमध्ये जाऊन तुम्ही सांगता द्वेषाचे राजकारण करु नका.आता सत्ता दूर जात आहे. तेव्हा आता भारत जोडो आठवतायत, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यांच्या सरकारमध्ये इतके मुख्यमंत्री झाले की, मोजता येणार नाही. यांनी फक्त बारामतीकडे बघितले. खड्ड्यांचे फोटो काढणारे हे. स्वतः काय बोलतात, नंतर काय होते हे बघावे. जनतेला सर्व माहिती आहे, असे प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी दिले.