BJP And MNS: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे राज्यभरातील विविध भागांचा दौरा करताना पाहायला मिळत आहेत. विविध बैठकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्षाला नवी उभारी देण्याचे प्रयत्न मनसेकडून केले जात आहेत. समृद्धी महामार्गावरील टोलनाका तोडफोडी प्रकारानंतर भाजप आणि मनसे आमनेसामने आल्याचे चित्र असताना मनसे आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यामुळे मनसे-भाजपा युतीची चर्चा सातत्याने होत आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतरही मनसे-उद्धव ठाकरे एकत्र येतील, असे बोलले जात आहे. यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक भाष्य केले आहे.
नेमके काय म्हणाले राज ठाकरे?
अजित पवार आणि शरद पवार यांची ही खेळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला गट सत्तेत सहभागी झाला आहे. तसेच होत आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांचे छायाचित्र असलेले फलक लागले आहेत. किती खोटे वागावे, यालाही मर्यादा असतात. सध्या राज्यात विरोधी पक्ष नाही. विरोधी पक्षनेताही नाही. कोणता पक्ष विरोधी आहे, हेच समजत नाही. या परिस्थितीत मनसेच एकमेव विरोधी पक्ष राहिला आहे. बाकी सगळ्यांचे एकमेकांशी लागेबंधे आहेत. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी कोणाला भेटले म्हणून युती होत नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...
सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ठीक आहे मग! तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? ते येणार नाहीत याचा आनंद आहे. आयुष्यभर त्यांनी महायुतीत येऊ नये अशी सदिच्छासुद्धा आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.