Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती चिघळत असताना यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल. पाणी पिणे बंद केले असून, आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असलेले दिसत आहे. मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. शरद पवार असे म्हणाले होते, असे सांगत भाजप नेत्यांनी मागे काय घडले होते, याची आठवण करून दिली.
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा बांधवांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिले होते. मात्र हे आरक्षण टिकले नाही. मात्र मधल्या काळात २ वर्ष ८ महिने हा ग्रहण काळ होता. अशुभ घटना घडल्या. मराठा बांधवांचे आरक्षण टिकवण्यात अपयश आले. यावेळी वकील बदलण्यात आले. अशा परिस्थितीत बाजू मांडण्यात सरकार कमी पडले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही, शरद पवार असे म्हणाले होते
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आरक्षण देण्याच्या बाबतीत साकारात्मक आहेत. आज आरक्षण द्यावे असे म्हणणारे काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांचा इतिहास बघितला तर त्यांची भूमिका होती की, मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. शरद पवार असे म्हणाले होते. यामुळे शालिनीताई पाटील यांना पक्षातून बाहेर निघावे लागले, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. गेली कित्येक वर्षे ही मागणी आहे. तेव्हा सगळीकडे काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा कोणी काही बोलले नाही. हा मुद्दा आज आला, आज आरक्षण मागितले असे नाही. इतके वर्ष काँग्रेसचे सरकार पण प्रश्न का सुटला नाही? अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, राठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. मनोज जरांगे ९ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही. सरकारला कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. मराठा आरक्षण प्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे.