BJP vs Shiv Sena चंद्रपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिन्यातून ५ वेळा दिल्लीत जातात. त्यामुळे महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावं लागलं नव्हतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला जातात. त्यामुळे आता राज्यात लवकरच सत्तांतर होणार अशी भविष्यवाणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या भविष्यवाणीवर भाजपाकडून सणसणीत उत्तर देण्यात आले. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला होता, त्यांच्या नशिबात सत्ता येणं खूपच कठीण आहे, असा थेट इशाराच भाजपाच्यासुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
"संजय राऊत सत्तांतर होईल, असे म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल", असे प्रत्युत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. "आघाडी सरकार लवकर जाईल, असे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा हेच संजय राऊत म्हणायचे की, भाजपवाले जोतिषी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? मग आता राऊत जोतिषी झाले काय", असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी केला. "शिवसेना आता दोन तृतीयांश संपलेली आहे आणि उर्वरित लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत. पण मला हे सांगावेसे वाटते की ज्यांनी ऑक्टोबर २०१९ ला खंजीर खुपसण्याचे काम केले त्यांच्या नशिबात सत्ता येणे कठीणच आहे", असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
संजय राऊत सातत्याने सत्तांतराच्या गोष्टी करत आहेत. त्यावर अजित पवार यांनीही त्यांच्यावर टीका केली. "आमच्या संपर्कात कुणी आमदार नाही. त्यामुळे मी कशाला उगाच काहीतरी सांगू. आमच्या संपर्कात कुणी आमदार आल्यानंतर मी त्याबद्दल काही सांगेन. आज माझं स्वत:चं मत आहे की, आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यावं", असं त्यांनी सुनावलं.