मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळाली नसल्याची चर्चा होती. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडूही नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आजघडीला अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. हे ज्वालामुखी कधी फुटतील, हे सांगता येत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊन अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकार अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे, असे म्हटले आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी "फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार" असं म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी खुद्दारी करणारी शिवसेना ही आमच्यासोबत" असं देखील म्हटलं आहे. "बिना चेहऱ्याचं सरकार म्हणजे जनतेचं सरकार आणि फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार. सामनामधून टीका करण्याचं कारण काय? जेव्हा सत्ता जाते तेव्हा वेदना होतात" असं म्हटलं आहे.
"जनादेशाचा अवमान करून, जनतेच्या पाठीत खंजीर खूपसून सत्ता प्राप्त केली, ती सत्ता जेव्हा जाते तेव्हा वेदना होतात, दु:ख होतं. त्यांचं आयुष्य हे फक्त माझा परिवार आणि माझा पक्ष, प्रथम मी आहे. सत्ता जाण्याचं जे दु:ख आहे ते कुठेतरी हलकं व्हावं म्हणून हे अशाप्रकारची टीका करतात" अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला ४० दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.