मुंबई – शिवसेनेचा खरा चेहरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते अशा शब्दात भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने बेईमानी केली असा थेट आरोप मुनगंटीवार यांनी लावला आहे.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर(BJP Sudhir Mungantiwar) म्हणाले की, शिवसेनेचा खरा चेहरा बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होईल. प्रत्येक पक्षात नेतृत्व करणारे नेते प्रचंड क्षमतावान असतात. त्यांचे नियोजन आण काम करण्याची शैली असते. निश्चितपणे भाजपाचे कर्णधार नरेंद्र मोदी आहेत. मोदींमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे की १९८४ मध्ये २ खासदार असलेल्या पक्षाला आज ३०३ खासदारांपर्यंत पोहचवलं. पुढील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा आणखी वाढणार आहे अशी त्यांची कार्यशैली आहे. आमच्यासाठी मोदी देशगौरव आहेत आणि जगासाठी विश्वगौरव आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाने युती तोडली असं म्हणणं म्हणजे ते जगातील आठवं आश्चर्य ठरेल. ज्यादिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपाचे १०५ आमदार आले तेव्हा असं वाटलं की आता भाजपा कुणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापनं कठीण आहे. तेव्हाच निकालाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली. शिवसेनेने युतीसाठी कधी प्रयत्न केला नाही. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. बेईमानीचं आयुष्य फारकाळ टिकत नाही. २०२४ ला अथवा जेव्हा कधीही महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल तेव्हा जनता मविआ नेत्यांची लक्तरे फाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही
पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो, पाठीमागून नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही. चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. आमचे १०५ आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत. पण आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही असं काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले होते.