ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण स्वत:हून भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणार नसल्याचे स्पष्ट केले. कडोंमपा आणि कोल्हापूरमध्ये भाजपाचाचा महापौर बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी भाजपाने त्यांचा मार्ग निवडला असल्याने आम्ही ताणाताणी करणार नाही, आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास मोकळे आहोत, असे सांगितले.
कडोंमपामध्ये शिवसेनेला ५२ तर भाजपाला ४२ जागा मिळाल्या असून सत्तास्थापनेसाठी कोणाकडेही स्पष्ट बहूमत नसल्याने दोन्ही पक्ष राजकीय समीकरणे जुळवण्यात व्यस्त आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपासमोर सर्व पर्याय खुले आहेत, निसर्गाचे नियम पाळून पक्ष पुढील पाऊले टाकेल असे सांगत दानवे यांनी कडोंमपासह कोल्हापूरमध्येही भाजपाचाच महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता भाजपाला सेनेसोबत यायचं नाही हेच दानवेंच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे भाजपा जर त्यांच्या मार्गाने जाणार असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाण्यास मोकळे आहेत, असे सांगितले.