मुंबई: मशिदीवर लावलेले भोंगे उतरवा, अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी आक्रमक भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर भाजपनं राज यांच्या सूरात सूर मिसळला. तर शिवसेनेनं राज यांना भाजपचा भोंगा म्हणत त्यांच्यावर टीका केली. आता राज यांनी आव्वाज दिल्यानंतर भाजपनं भोंगे वाटण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उद्या हनुमान जयंतीला राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पक्ष स्थापनेनंतर मराठीचा राग आळवणाऱ्या राज यांनी आता आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. पुण्यातील हनुमान मंदिरात उद्या राज यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्यासाठी मनसेनं पोस्टर तयार केली आहेत. त्यावर राज यांच्या नावापुढे हिंदूजननायक अशी उपाधी लावण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा राज यांच्याकडून अधिक आक्रमकपणे लावून धरला जाणार हे स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे भाजपनं हनुमान जयंतीसाठी भोंगे वाटपाची तयारी सुरू केली आहे. उद्या हनुमान जयंतीनिमित्त आम्ही 1000 लाऊडस्पीकर देशभरातील मंदिरांना देणार आहोत. त्यानंतर आणखी अर्ज आल्यास त्याची पडताळणी करून त्यांना सुद्धा आम्ही लाऊड स्पीकर देणार आहोत, असं भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांगितलं. मशिदींवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता घटवण्यासाठी आम्ही हे सगळं करत असल्याचं ते म्हणाले.
शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्यानं त्यांना आक्रमक हिंदुत्वाला मुरड घालावी लागत आहे. त्यामुळेच शिवसेनेची स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरू आहे. हिंदुत्ववादी मतं हातून जाऊ नयेत म्हणून आता शिवसेनेनं कंबर कसली आहे. मुंबईच्या दादरमधील हनुमान मंदिरात (गोल मंदिर) महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.