मुंबई: ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी भाजपनं सर्वतोपरीनं प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं. आरक्षण नुसतं गेलं नाही, तर त्याचा खून पाडण्यात आला. सरकारनं आरक्षणाची कत्तल केली, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यात भाजपचं सरकार होते, त्यावेळीही ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न होत होते. पण, आम्ही सजग होतो. तत्काळ अभ्यास केला. केंद्राकडून डेटा मागितला. मात्र, केंद्राने लाखो चुका असल्याचं सांगत तो दिला नाही. आम्ही पुन्हा, न्यायालयात गेलो. जिथे एससी/एसटीच्या जागा कमी होत्या, तेथील जागा ओबीसीना दिल्या. यामुळे न्यायालयाचं समाधान झाले. त्यामुळे जोपर्यंत इम्पेरिकल डेटा तयार होत नाही, तोपर्यत हा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. पण, राज्यात आघाडी सरकार आले. या सरकारनं विश्वासघात केला, असा आरोप फडणवीसांनी केला.
निवडणूक झाल्या तर आता पुढील पाच वर्ष काहीही होणार नाही. गेल्यावेळी आरक्षणाशिवाय निवडणूक झाल्या, हा दाखल देत पुढे निवडणुका होतील. हे आरक्षण आपण घालवून बसू. त्यामुळे ओबीसींसाठीचा लढा सोडणार नाही. त्यासाठी किंमत चुकवावी लागली, तरी हा संघर्ष सुरुच राहील. आरक्षण मिळो अथवा न मिळो. भाजप येत्या निवडणुकीत २७ टक्के तिकीट ओबीसी समाजाला देणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली.