- यदु जोशी, मुंबई
आगामी महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान पार पडणार आहे. आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर मुंबईत आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क असलेली शिवसेना मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर नेण्याची क्षमता राखते ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा आधार घेतला जात आहे.शिवसेनेचे महापालिका निवडणुकीचे नियोजन साधारणत: वर्षभरापूर्वी सुरू होते. कट्टर शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवा सेनेचे कार्यकर्ते घरोघरी संपर्काची योजना बनवतात. शिवसेनेच्या शाखांमधून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. कार्यकर्त्यांचा राबता असतो आणि अडीअडचणी घेऊन अनेक नागरिक या शाखांमध्ये येत असतात. अशा नेटवर्कचा अभाव ही भाजपाची डावी बाजू आहे. नागपुरात रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे कॅडर भाजपाच्या उमेदवारांना मदत करते. मुंबईत मुळात शिवसेनेच्या तुलनेने संघाचे कॅडर फारच कमी आहे. तरीही आहेत त्या लहान-मोठ्या स्वयंसेवकांची मदत घेण्याचा प्रयत्न भाजपाचे उमेदवार करीत आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांमधून लहान-मोठे नेते भाजपात आले, पण त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे पूर्वीपासूनचे कार्यकर्ते यांच्यात समन्वय निर्माण होऊ शकला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते. शिवसेनेतून आलेले नाना अंबोले, प्रभाकर शिंदे, तसेच बबलू पांचाळ यांच्या पत्नीच्या वॉर्डात फेरफटका मारला असता ही बाब जाणवते. मराठी मतदारांचा टक्का जास्त असलेले भाग हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात. त्या ठिकाणी जास्त आणि इतर भागात कमी मतदान झाले तर त्याचा मोठा फायदा शिवसेनेला तर तितकाच मोठा फटका भाजपाला बसू शकतो. हिंदी, गुजराती आणि दाक्षिणात्य बहुसंख्य असलेल्या भागांमध्ये ‘आपले’ मतदार कोण हे हुडकून त्यांना जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर आणण्यासाठी भाजपानेही रणनीती आखली आहे. त्यासाठीची जबाबदारी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना देण्यात आली असल्याचे प्रचार यंत्रणेतील एका नेत्याने सांगितले. मराठीबहुल भाग शिवसेना वा मनसेचा आहे असे समजून वाऱ्यावर न सोडण्याच्या सूचना त्या भागातील भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. दादर-माहीम हा सेना-मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर या ठिकाणी निवडून आले. मनसेचे नितीन सरदेसाई दुसऱ्या क्रमांकावर होते, पण भाजपाला तिसऱ्या क्रमांकाची तब्बल ३३ हजार मते मिळाली होती. याचा अर्थ सेना-मनसेच्या गडातही भाजपाचा मतदार आहे हे समजून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुंबई भाजपाच्या कार्यालयात विनाकारण गर्दी करणारे कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांना आपापल्या वॉर्डात मोर्चेबांधणी करा, इथे दिसू नका, असे बजावले जात आहे. मुंबईच्या आखाड्यात नितीन गडकरी- भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभांचा किल्ला लढवत असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, पुरुषोत्तम रूपाला, अभिनेते खासदार मनोज तिवारी यांच्या प्रचारसभा होणार आहेत. नायडू यांना दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्यास, रूपाला यांना गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी तर भोजपुरी नायक-गायक असलेले मनोज तिवारी यांना बिहारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात आणले जात आहे. ‘भाजपाने मुंबईसाठी काय केले,’ असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या सभांमधून करीत आहेत. त्याचे उत्तर उड्डाणपूलकरी गडकरी देणार आहेत.हायटेक वॉररूम मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वाळकेश्वर भागातील भाजपाची हायटेक वॉररूम ही अॅक्शन मोडवर आहे. तेथे २०० तरुण-तरुणी काम करीत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटरवरून पक्षाचा प्रचार करण्याचे आणि अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याचे काम तेथून चालते. याशिवाय, निवडणुकीच्या घडामोडींवर या वॉररूममधून नजर ठेवली जाते. कोणत्या घडामोडीचा पक्षावर काय परिणाम होईल याचे विश्लेषण करून पक्षाला ‘फीडबॅक’ दिला जातो. ही वॉररूम प्रदेश भाजपा उपाध्यक्ष व निवडणूक विभागप्रमुख आ. मंगल प्रभात लोढा आणि प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे.विकासरथ प्रचारातमुंबईच्या विकासाचा भाजपाने दिलेला जाहीरनामा, राज्य सरकारने मुंबईसाठी घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांचे विकासाचे व्हिजन याची माहिती देणारे एलईडी स्क्रीनयुक्त विकासरथ भाजपाने तयार केले असून, ते प्रत्येक वॉर्डात फिरत आहेत. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याकडे या विकासरथांची जबाबदारी देण्यात आली आहे.