लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. सरकार ज्या पद्धतीने या कराची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असून, सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय जीएसटी लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे. आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, सर्व अप्रत्यक्ष कर रद्द करून एकच कर ठेवावा, असे जीएसटीचे मूळ स्वरूप आहे, पण भाजपा सरकार ज्या पद्धतीने हा कर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ती पद्धतच पूर्णत: चुकीची आहे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये चार टप्पे करण्यात आले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्के असे वेगवेगळे करटप्पे यात आहेत. शिवाय, सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी आणि आंतरराज्य जीएसटी असे वेगवेगळे कर भरावे लागणार आहेत. यातील आंतरराज्य जीएसटी तर थेट जकातीचाच प्रकार आहे. जगात जिथे-जिथे जीएसटी आहे, तिथे वेगवेगळे दर असले, तरी एकच कर भरावा लागतो, पण भारतातील या कराचे दर सर्वात जास्त असून, चार प्रकारच्या जीएसटीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यवसायानुसार आणि वस्तुनुसार वेगळा कर लावला आहे. पत्रकार परिषदेला पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार चरणजीत सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील उपस्थित होते.
भाजपाने जीएसटीच्या मूळ हेतूला हरताळ फासला
By admin | Published: June 24, 2017 3:55 AM