Amit Shah Rally in Sakoli Bhandara: लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. सर्वपक्षीय प्रचारसभांवर भर देताना दिसत आहेत. यातच भाजपाचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह यांच्या एकामागून एक सभा महाराष्ट्रात होत आहेत. साकोली भंडारा येथील सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शरद पवार यांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री होतात. मात्र त्या दहा वर्षात तुम्ही आम्हाला काय दिले? भंडारा-गोंदियासाठी काय केले? त्यापेक्षा कितीतरी जास्त नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राने भंडारा-गोदियासाठी केले आहे, असा दावा करताना, महाराष्ट्राचे भले केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपा हेच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताला पुढे नेण्याचे काम केले आहे, असे अमित शाह यांनी नमूद केले.
आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला नाही
आताच्या घडीला महाराष्ट्रात अर्धी शिवसेना आणि अर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक आहे. या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षालाही अर्धेमुर्धे केले आहे. हे तीन अर्धवट पक्ष कारभार करु शकतील का? उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात की, भाजपाने आमचा पक्ष फोडला. पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक गोष्ट स्पष्ट करतोय की, आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि शरद पवार यांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असे अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या १० वर्षांचा काळ हा काँग्रेसने खोदलेला खड्डा बुजवण्यातच गेला. पुढील पाच वर्षात महान भारत बनवण्याचे काम होणार आहे. पंतप्रधान मोदींनी देशासमोर एक संकल्प ठेवला आहे. २०४७ मध्ये महान भारताची रचना करणार आहेत. भाजपा सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरी कायद्याला लागू करणार असल्याचे सांगत भाजपाने जाहीरनामा असलेल्या संकल्पपत्रात काय घोषणा केल्या, याचा पुनरुच्चार अमित शाहांनी केला.