Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला खरपूस शब्दांत प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके-खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केले, याचे आत्मपरीक्षण करावे. सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.
दावा सगळेच करत असतात, पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही
दावा सगळेच करत असतात. पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही. राज्यातील जनतेने दावा करायला हवा. उद्धव ठाकरे बोलतात, पण त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदारही आगामी निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे राहतील की नाही? हे माहीत नाही. त्यांना कुठलेही अस्तित्व राहिले नाही. त्यांना सोडून गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, या शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.
दरम्यान, अजित पवारांना प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहिती नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो असेही ते म्हणाले. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात. अजित पवाराचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा नारायण राणेंनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"