पणजी : भाजप हा शिवसेनेचा राजकीय शत्रू असल्याचे सांगत गोव्यात सुरक्षा मंचबरोबर युती करण्याची बोलणी प्राथमिक स्तरावर असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.शिवसेना गोव्यात निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत. आपण स्वत: वारंवार गोव्यात येणार आहे, शिवाय खासदार संजय राऊत हे गोव्यासाठी पूर्ण लक्ष देणार आहेत, असे उद्धव यांनी सांगितले.गोवा सुरक्षा मंच पक्षाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. माध्यम विषयावर शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मातृभाषेतून शिक्षण हा सेनेचाही आग्रह आहे. भाषा मंचशी संलग्न असलेल्या गोवा सुरक्षा मंच या नव्यानेच निर्माण केलेल्या पक्षाबरोबर युतीची अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी ती दिवाळीनंतर केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना किती जागा लढविणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार आहे याविषयी माहितीही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गोव्यात भाजपनेच सेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवल्यास तो स्वीकारणार का, या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. भाजपकडून तसा प्रस्ताव येणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. बहुतेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी पुढच्या वेळी देतो असे सांगून टाळली. (प्रतिनिधी)
भाजपा सेनेचा राजकीय शत्रू
By admin | Published: October 24, 2016 5:28 AM