BJP Vinod Tawde News: दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार म्हणतात की, गोव्याला भारतीय संविधान लागू करू नये. कर्नाटकातही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. गोव्यातील काँग्रेस उमेदवार म्हणतात की, राहुल गांधी यांच्याशी बोलून त्यांची अनुमती घेऊन विधान केले. दुसरीकडे भाजपाला संविधान बदलायचे आहे. म्हणून ४०० पारचा नारा दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी करतात. परंतु, काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा संविधान बदलले आहे, असा पलटवार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडे म्हणाले की, भाजपा आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपाने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यास काही मिळाले नाही की, विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून अशी विधाने होतात, या शब्दांत विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला.
आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा
महाराष्ट्राच्या जनतेला मोदी सरकारमधून काय मिळाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम हे महाराष्ट्राला मिळाले. ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले. मोदी सरकारकडून राज्याला काय मिळाले याचा विचार होणे गरजेचे आहे. राज्याला २५३ टक्के अनुदानाच्या रूपाने आले याचा जनतेने विचार करायला हवा. आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.
दरम्यान, काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने पंतप्रधान आवास योजनेतून चार कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला.पीएम आवासमध्ये २७ लाख घरे महाराष्ट्राला दिली, शौचालय बांधली आहे. आयुष्यमान भारत योजनेत कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे. तसेच पहिल्या टप्प्यात भाजपाला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही. अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करने मनाला वेदना देणारे आहे, अशी खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली.