BJP Prasad Lad vs Shivsena Arvind Sawant: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीच्या दर्शनाने ते महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात करत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय त्यांनी नुकताच जाहीर केला होता. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, पण आता बाहेर फिरत आहेत त्यामुळे हा दौरा म्हणजे नौटंकी आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बावनकुळे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. त्यावरून आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांना थेट ताकीद दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे नौटंकी असल्याचे सांगितले. त्यावर अरविंद सावंत यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी, "चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे नसून 'खुळे' आहेत" असे अरविंद सावंत म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार प्रसाद लाड अरविंद सावंतांवर बरसले. "काल-परवापर्यंत घरी बसलेले, झोपी गेलेले आता जागे झालेत आणि दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत साहेबांची झाली आहे. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलावे ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. अरविंद सावंत साहेब, आता मी तुम्हाला साहेब म्हणतोय. पण तुम्ही जर पुन्हा अशी चूक केलीत तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही," असे सक्त ताकीदच आमदार प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांनी दिली.
"सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे," असे ट्वीट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर, "भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. त्यांनी कोणावरही टीका करू नये," असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.