मुंबई - भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत राजकीय समिकरणेच बदलून टाकले. मात्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार अधिककाळ टिकनार नाही, अशीच भावना भाजप नेत्यांची आहे. आतापर्यंत भाजपच्या आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरकार लवकरच कोसळेल अशी भावना व्यक्त करून दाखवली आहे.
खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. पाटील हे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेवर टीका करत आले आहे. तसेच हे अल्पअवधीचे सरकार असल्याचा पुनरोच्चार करत आहेत. हे सरकार पाडायची गरजस नसून हे आपोआपच पडले असं भाकीत त्यांनी केले आहे. तर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नाराजीकडे लक्ष वेधताना सरकार कोसळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला होता.
मुनगंटीवार यांच्याआधी भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील हे सरकार जावून राज्यात पुन्हा भाजपच सत्तारूढ होईल, असा दावा केला होता. भिन्न विचारसरणी असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं म्हटले होते. भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याच विचारात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधकांना सरकार कोसळण्याचीच अधिक प्रतीक्षा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.