मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा जोरात सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर महजानादेश यात्रात स्थिगीत करण्यात आली होती. परंतु, आता ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली असून भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची योजना केल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यासाठी अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहे. भाजपने देखील त्यांना प्रवेश दिला आहे. तर शिवसेनेकडून दावा करण्यात येणाऱ्या मतदारसंघात देखील भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेसोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाल्यास भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, यामुळे कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. याउलट भाजपची तयारी स्वबळावर बहुमत मिळविण्याची आहे. त्यासाठी उभय पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली आहे. त्यात भाजपच सध्या तरी आघाडीवर दिसत आहे.
राज्यात भाजपची ताकत शिवसेनेच्या तुलनेत वाढली आहे. याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे. तसेच युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप देईल तेवढ्या जागांवर शिवसेना समाधान मानण्याची शक्यता आहे.
सेनेची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा
युवेसेना प्रमुख आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेत त्यांनी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीनंतर आदित्य यांनी जन आशीर्वाद यात्रा थांबवली होती. त्यांची ही यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. यात्रेचा हा तिसरा टप्पा असणार आहे. यामुळे एकूणच युतीच्या भवितव्याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे.