राष्ट्रवादी पुन्हा येणार धावून ? सत्तास्थापनेसाठी भाजपला हवाय बाहेरून पाठिंबा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 04:59 PM2019-11-18T16:59:08+5:302019-11-18T17:01:54+5:30
भाजप आणि शिवसेनेतील समसमान वाटपाचा मुद्दा आता पराकोटीला गेला आहे. तर राज्यातील शिवसेनेचे नेते शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं समीकरण गृहित धरत आहेत. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला साथ देणार अशी शक्यता निर्माण होत आहे.
मुंबई - एनडीएमधून बाहेर पडत युतीसाठीचे परतीचे दोर कापणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. किंबहुना आघाडीकडून दररोज लांबत चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ शिवसेनेची चिंता वाढविणारे आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा तर देणार नाही ना, याचीही शिवसेनेला चिंता आहे.
2014 मध्ये शरद पवार यांनी निकाल लागताच भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर झटक्यात कमी झाली होती. त्याचीच भिती यावेळीही शिवसेनेला होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पॉवर अशी लढत झाल्यामुळे हे शक्य होणार नाही, असं वाटत होते. त्याचवेळी राजकारणात शत्रुत्व आणि मित्रत्व कायम नसतं हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा भाजपला बाहेरून पाठिंबा देते की, काय अशी शक्यता व्यक्त होत आहे.
याला कारणही तसंच आहे. शरद पवार अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या दिल्लीत आहेत. यावेळी शरद पवारांना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात विचारण्यात आले. त्यावर पवार यांनी गुगली टाकताना सत्तास्थापनेविषयी शिवसेना-भाजपला विचारा असा सल्ला दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणात राष्ट्रवादी पक्षाचे कौतुक केले. या दोन्ही घटना एकाच दिवशी दिल्लीत घडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
भाजप आणि शिवसेनेतील समसमान वाटपाचा मुद्दा आता पराकोटीला गेला आहे. तर राज्यातील शिवसेनेचे नेते शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं समीकरण गृहित धरत आहेत. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला साथ देणार अशी शक्यता निर्माण होत आहे.