मुंबई - जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, याआधी पक्षाच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होते. देशात अनेक ठिकाणी अशी उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री होते, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करत होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यात असे प्रसंग घडले आहेत. परंतु एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं, वर्षा बंगल्याचं, सत्तेचे मग त्यांना शिकार सोडावी वाटत नाही असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.
तसेच उद्धव ठाकरे यांना वाटलं आपल्या सरकारने बहुमत गमावलं आहे तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला. सत्तेचा मोह नाही. मिळालं, काम केले, सत्ता सोडली आणि निघून गेले. हे सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केले, ज्यांना नाही जमलं ते आदळआपट करतात. शपथविधी सोहळ्यावर भाजपाची छाप दिसली, कारण पंतप्रधान स्वत: तिथे होते. व्यासपीठ पाहिले तर भाजपाचे बहुतेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाचे १३२ आमदार आहेत. त्यामुळे छाप असणार आहे. व्यासपीठावर भाजपा नेत्यांचा वावर स्पष्ट दिसत होता. बहुमत मिळूनही फायदा काय हा लोकांचा सवाल आहे. अजून सरकार बनवले नाही, कॅबिनेट मंत्री बनवले नाही तर त्याचा फायदा काय..? प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते असंही संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, इतकं बहुमत असतानाही तिघांना शपथ घ्यायला १५ दिवस लागले. २३५ हून अधिक आमदार त्यांच्याजवळ होते. तरीही १५ दिवस सरकार बनवू शकले नाहीत. आझाद मैदानावर जो सोहळा झाला त्यात केवळ ३ जण होते. महाराष्ट्रासारख्या राज्याला आजही पूर्ण सरकार मिळालं नाही. आजही सर्वकाही ठीक नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते शेवटच्या क्षणी शपथ घ्यायला पोहचले, भाजपाने ठरवलं होतं, जर ते शपथ घेत नसतील तर त्यांच्याशिवाय हा सोहळा होणार होता. त्यानंतर माझे उपमुख्यमंत्रिपदही जाईल तेव्हा ते तिथे पोहचले असं संजय राऊतांनी सांगितले.
शक्यता नाकारता येत नाही
२ आठवडे झाले तरी सरकार नाही ही अस्वस्थता करणारी गोष्ट आहे. चांगले प्रशासन त्यांनी द्यावे ही माफक अपेक्षा आहे. लोकांचा कौल आपल्याला मान्य करावा लागतो. देशात महाराष्ट्राला एक नंबरला न्यावे, महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये. महाराष्ट्राचा हक्क, सन्मान ठेवला पाहिजे. संजय राऊतांनी केलेला दावा नाकारता येत नाही. कारण जे आमंत्रण व्हॉट्सअपवर आले त्यात दोनच नावे होती. ते खरे निमंत्रण आहे की नाही मला माहिती नाही असं सांगत सुप्रिया सुळे यांनी राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिला.