मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव यांच्या या दौऱ्याचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी भाजपकडून खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेची अनेक वर्षांची मैत्री तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेची हिंदुत्वादी विचारधारा आणि याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचार यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असंच बोलले जात होते. भाजपकडून देखील या आघाडीवर सातत्याने टीका करण्यात आली. तसेच शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावर पक्ष चालत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा काढून हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड केली नसल्याचा संदेशच दिला आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्यावर आनंदच व्यक्त केला. उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत त्यांनी केले. मात्र अयोध्या दौऱ्यात ते आमच्यासोबत असायला हवे होते, अशी खंतही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना देखील शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे पसंत पडले नसते, असंही शेलार यांनी म्हटले आहे.