मुंबई: कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे सध्या पक्षप्रवेश होत आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. सध्या उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे दिवस आहेत. इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही, पण शिवसेनेकडे अद्यापही निष्ठा आहे, असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेतील इनकमिंगचं समर्थन केलं. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर भाष्य करताना राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा संदर्भ दिला. भाजपामध्ये होणारे प्रवेश केवळ स्वार्थापोटी होत असल्याचं पाटील म्हणतात. कोणी कुठे गेल्यावर शुद्ध होतो, यावर माझा विश्वास नाही. गरजेतून राजकारणात तडजोडी होतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपामधील इनकमिंगवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र शिवसेना याला अपवाद असल्याचं ते म्हणाले. 'सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यांना आम्ही कोणतंही वचन दिलेलं नाही. कोणत्याही कमिटमेंटशिवाय ते शिवसेनेत आले आहेत,' असं राऊत यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ज्यांना आज या पक्षांतराची चिंता वाटते, त्यांनी आधी काय केलं, असा सवाल राऊत यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली अनेक माणसं काँग्रेस, राष्ट्रवादीनं फोडली. त्यावेळी शिवसेनेला काय वाटलं असेल, याचा विचार फोडणाऱ्यांनी केला होता, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेतील इनकमिंगचं समर्थन करताना त्यांनी सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्ष न टिकल्यास सत्ताधारी मुजोर होईल आणि लोकशाहीचं डबकं होईल, असं राऊत म्हणाले.
संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे पक्षप्रवेश होताहेत; भाजपामधील इनकमिंगवरुन शिवसेनेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:48 PM