सोलापूर- भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. अकलूज येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली. यावेळी मोहिते पाटलांनी यांनी आपली भूमिकाही मांडली.
यावेळी धैर्यशील मोहिते म्हणाले, मी दिवाळीत निवडणुकीची इच्छा व्यक्त केली होती. मी सगळ्या मतदारसंघात फिरलो, पण भाजपने उमेदवारी जाहीर केली नाही. मी विचार केला यंदा नाही, पुढच्यावेळेस संधी मिळेल. मी ज्या-ज्या गावात जायचो, तिथे लोक निवडणूक लढण्याचा आग्र धरायचे. एका गावात तर मला तरुण पोरांनी सांगितले, उभे राहणार असाल तर या, नाहीतर येऊ नका. लोकांनी वेदना सांगण्यास सुरुवात केली. पाण्याची परिस्थिती काय आहे हे सांगितलं. त्यादिवशी ठरवले की माझ्यासाठी नाही तर लोकासाठी निवडणूक लढवायची. घरचा कारभारी नीट असला तर घर नीट चालतं. माढा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
रणजित निंबाळकरांवर टीकामी कार्यकर्त्यांना विचारुनच निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवले. काहीजण मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलेत की, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1 कोटी आणले. लोकांना ही रक्कम दिसली नाही. काय काम करायचे त्यांना माहिती देखील नाही. आज मला फक्त एकाला उत्तर द्यायचे आहे. तो या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. मांडव्यात तो म्हणाला 70-75 वर्षात जो विकास झाला नाही, तो मी अडीच वर्षात केला. मी एकच सांगतो, दादाच्या सांगण्यावरुन या सर्वांनी तुला एका रात्रीत खासदार केले. तुझे पार्सल एक रात्रीत परत पाठवायचे आहे, असे मोहिते पाटील म्हणाले.
माढ्यामधून भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर मैदानात आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याने त्यांची माढ्यातून उमेदवारी पक्की झाली आहे. त्यामुळे आता माढ्यात रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील, अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.