मुंबई : शिवसेनेबरोबरचे नाते भाजपाने तोडलेले नाही, असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार नाही. त्यांनी सरकार स्थापनेकरिता बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.शहा म्हणाले की, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार सत्तेवर बसेल. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने भाजपा दोन पाऊल पुढे गेली आहे. गेल्या चार महिन्यांतील मोदी सरकारच्या कामगिरीवर या निकालाने मोहर उमटली आहे. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या विरोधी निकाल लागल्याने मोदी लाट संपुष्टात आल्याचा केला गेलेला दावा फोल ठरला आहे. दोन्ही राज्यांत आतापर्यंत भाजपा स्वबळावर लढत नव्हती, असे नमूद करून शहा म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत हरियाणात भाजपा २६ जागा लढली व १६ जागांवर विजयी झाली. यावेळी तेथील सर्वच्या सर्व ९० जागा लढून ४८ जागांवर विजय मिळवला. (प्रतिनिधी)
भाजपाचा मुख्यमंत्री होईल - शहा
By admin | Published: October 20, 2014 6:22 AM