विधान परिषदेत युतीचं 'जागा'वाटप; सभापती भाजपाचा, उपसभापती शिवसेनेचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:05 PM2018-07-09T19:05:50+5:302018-07-09T19:12:02+5:30
विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपा विधान परिषदेतल्या सभापतीपदावर दावा करण्याची शक्यता आहे.
मुंबई- विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपा विधान परिषदेतल्या सभापतीपदावर दावा करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडे आता विधान परिषदेतही आवश्यक संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा विधान परिषद सभापतीपदावर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर उपसभापतीपद हे शिवसेनेसाठी सोडण्याचीही तयारी भाजपानं दर्शवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या महिन्याअखेरीस रिक्त होत असलेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ पाचने वाढून भाजपा हा वरच्या सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या 11 सभासदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन आणि शिवसेना व शेकापचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे पाच आणि शिवसेनेचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या तडजोडीनुसार काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. तर अन्य पक्षांनी अतिरिक्त उमेदवार न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य जयंत पाटील हेसुद्धा आपली जागा राखू शकतील.
सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, काँग्रेसचे 18, भाजपाचे 20 आणि शिवसेनेचे 11, शेकाप, जदयू, पीआरपी यांचे प्रत्येकी एक आणि सहा अपक्ष सदस्य आहेत. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर हे चित्र बदलणार असून, भाजपा अव्वल स्थानावर जाणार आहे.