कल्याण - मागील काही दिवसांपासून भाजपानं 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतले आहे. त्यात शतप्रतिशत भाजपा कार्यक्रम राबवला जाणार आहे. देशातील १४० मतदारसंघात केंद्रीय नेतृत्वानं विशेष लक्ष देण्याची जबाबदारी मंत्र्यांवर टाकली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. याच १६ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा ३ दिवसीय कल्याण लोकसभा दौरा आयोजित करण्यात आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १६ मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे या १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. भाजपाने १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आल्याने या मतदार संघावर भाजपा दावा करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
कल्याण मतदारसंघावर भाजपा दावा करणार?२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत असे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रभारी संजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत येत्या ११ ,१२,१३ तारखेला म्हणजेच रविवारी ,सोमवारी ,मंगळवारी माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे सांगितले.
११ तारखेला मंत्री ठाकूर डोंबिवलीमध्ये येणार असून डोंबिवलीमधील भाजपाचे पदाधिकारी, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संवाद भेट घेणार आहेत. सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थीशी संवाद साधणार आहेत. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ उल्हासनगर या चारही मतदार संघात या तीन दिवसांमध्ये दौरा केला जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजप कसे होईल या दृष्टीने भाजपा प्रयत्नशील आहे.
दरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला आहे. भाजपाचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. असे असतानाचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपाने लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.