जळगाव : भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना प्रचंड त्रास झाला. त्यांना रांगेत उभे राहावे लागले. ग्रामीण भागात या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात राग असून तो, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानातून व्यक्त होईल. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सोमवारी भोकर येथे केले.शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सुरेशदादा जैन यांची ही पहिलीच सभा होती. ते म्हणाले, शेतकरी अडचणीत आहेत. त्यांचे कर्ज माफ व्हावे. शेतीची कर्जमाफी व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील तीन वर्षे सरकारकडे मागणी करीत आहेत. वारंवार हा मुद्दा शिवसेनेकडून सरकारकडे मांडला जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मक विचार करायला हवा. शिवसेना फक्त मते मागत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सतत आग्रही असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिकाही शिवसेनेची आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘भाजपाला निवडणुकीत फटका बसेल’
By admin | Published: February 14, 2017 3:37 AM