पुणे: राज्यातील सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा करणारं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व्यंकय्या नायडूंना लिहिलं. सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापर केला जात आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्र्यांवर, नेत्यांवर दबाव आणला जात आहे, अशा आशयाचं पत्र राऊत यांनी लिहिलं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल, असं विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
१० मार्चनंतर राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असं वक्तव्य पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलं. याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आपण तसं बोललो असं पाटील यांनी सांगितलं. 'कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. या परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यात भाजपचं सरकार येईल, असं म्हणालो,' असं पाटील यांनी सांगितलं.
सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांचे मेळावे सुरू आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा त्रास तळागाळातील कार्यकर्त्यांना होतो. त्यांनी त्यांची काळजी माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हा १० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपलं सरकार येईल, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी तसं बोलावं लागतं, असं पाटील म्हणाले.