मुंबई - कितीही पैशांचा पाऊस पाडला, बंडखोर उभे केले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. राज्यात आजही लोकसभेच्या निवडणुका लागल्या तरी मविआत जागावाटपासंदर्भात काही अडचण येणार नाही. आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि विधानसभेत १८५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत बहुमतासाठी ८५-१०० जागा कमी पडतील असं देशात वातावरण आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार या प्रमुख राज्यातून भाजपाच्या भरपूर जागा कमी होतील. या जागा विरोधी पक्ष जिंकतील. मागच्यावेळी बिहारमध्ये नितीश कुमार भाजपासोबत होते. किमान तिथे २० जागा कमी झाल्या तरी भाजपाला किती मोठा फटका बसेल. महाराष्ट्रात जागा कमी होतील. प. बंगालमध्ये १८ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. आता १८ जागा जिंकणे कठीण आहे. तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले.
मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केलीयशरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी कामाची नाही असं त्यांचे मत आहे. तिथे भाजपाचा अध्यक्ष असतो, सदस्य सत्ताधारी पक्षाचे जास्त असतात. पण आम्ही जेपीसीवर ठाम आहोत. पवारांविरोधात जाऊन आम्ही भूमिका मांडली. शरद पवार हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. सामनात काय लिहावं हे मला कुणी सांगितले नाही. मी अनेकदा माझ्या पक्षावरही टीका केली आहे. बाळासाहेबांनी खासगीत माझे कान उपटले असते. अनेकदा त्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. पक्षाचे मुखपत्र असले तरी स्तंभातून मी माझी भूमिका मांडत असतो. अनेकदा शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीच्या बाजूने भूमिका मांडली तेव्हा कुणाला अडचण झाली नाही असं संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले.
झुकायचं नाही हे ठरलंयआमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. आमचा हिंदुत्वाचा विचार, भूमिपूत्रांबद्दल विचार असेल ते कायम ठेऊन महाविकास आघाडीत आलोय. कुठल्याही परिस्थितीत झुकायचं नाही हे आम्ही ठरवलंय, बेकायदेशीरपणे पक्ष संपूर्ण चोरांच्या हाती दिला. आहे त्या संकटाला सामोरे जाऊन लढायचे. वाकायचे नाही हे ठरवले. फुटीर गटाचे नेतृत्व मी केले असते मी तुरुंगात गेलो नसतो. माझी मानसिकता जेलमध्ये राहण्याची होती. मी यातना करणार नाही हे मी ठरवले होते असंही राऊतांनी म्हटलं.