पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. अशावेळी आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर असे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र ''महाविकास आघाडी आता सर्वदूर एकत्र येऊन लढणार हे आम्ही गृहीत धरले आहे. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात भाजपला एकट्याला लढावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्याची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत' असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे. त्यांची
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले विचार मांडले. आगामी काळात भाजपच्या संघटनावाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
- सलग दुसऱ्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आहे, त्याविषयी पहिली प्रतिक्रिया काय आहे ?
जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप मानला जातो. अशा पक्षाचा एकदा प्रदेशाध्यक्ष व्हायला मिळालं याचा आनंद होताच आता ती जबाबदारी पुन्हा मिळाल्याचा अभिमान आहे. या पुढील काळात कार्यकर्त्यांचे सत्ताधरी पक्षाचे कार्यकर्ते ते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अशी मानसिकता करण्यात खूप मेहनत घ्यावी लागेल. आमचा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम नक्की करू.
- भाजपमध्येही एकनाथ खडसेंसारखे नेते अजूनही नाराज असल्याचे बोलले जाते, त्यासाठी काही विशेष परिश्रम घेणार का ?
प्रत्येक कुटुंबात थोडीफार नाराजी असतेच. मात्र ती नाराजी संपवली जाते आणि लोक आयुष्यभर त्यात राहतात. हे तर आमचं विचारांचं कुटुंब आहे. त्यामुळे ही नाराजी त्या-त्यावेळी संपवली जाते, गेली आहे. यापुढेही असा कोणता पक्ष निर्माण झाला तर सोडवण्यास आम्ही समर्थ आहोत.
- महाविकास आघाडीचे सरकार घेत असलेल्या निर्णयांकडे कसे बघता ?
सरकारच्या चांगल्या निर्णयाचं स्वागत आहे. डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, मराठीची सक्ती राष्ट्रगीत सक्ती, शिवभोजन थाळी अशा निर्णयांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी कर्जमाफी फसवी दिली आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही. अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची कर्जमाफी केलेली नाही. त्यांनी सध्या दिलेली करमाफी ही आधीच्या सरकारने दिलेली आहे.
- तुम्हाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते, त्याचा काही त्रास होतो का ?
आम्ही समाधानी आहोत. दिवसभराच्या कामाच्या आढाव्यानंतर काही चूक झाली असे वाटत नसेल तर अशा 'ट्रोलिंग-बिलिंग'ला मला काही अर्थ वाटत नाही.काही बाबतीत अतिरेक होतो आहे. खुर्ची तुटण्यासारखी क्षुल्लक गोष्ट ट्रोल होणे पटण्यासारखे नाही.
- पालकमंत्री म्हणून अजित पवार पुण्याच्या प्रश्नांसंदर्भांत करत असलेल्या कामावर समाधानी आहात का ?
मी देखील पुण्याचा पालकमंत्री होतो. अजित पवार आढावा घेतात याचा आनंद आहेत. पण ते घेत असलेला आढावा हा आम्ही घेतलेल्या निर्णयांचा घेत आहेत. आम्हीच आणलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा, मेट्रो, रिंगरोड अशाच योजनांना ते गती देत आहेत.
- तुमचं फेरनिवडणूक होतील हे वक्तव्य गाजले होते, त्यावर अजूनही ठाम आहात का ?
सरकारमध्ये अंतर्गत विरोध वाढतो आहे. उदा. नितीन राऊत म्हणतात वीज मोफत तर दुसरीकडे अजित पवार पैसे कुठून आणणार असं विचारतात. राज्यसभेत अनिल देसाईंनी प्रायव्हेट बिल आणले आहे. त्यात त्यांनी दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सुविधा देणे बंद कराव्यात अशी मांडणी केली आहे. हा जवळजवळ समान नागरी कायदा झाला आहे. त्यांनी याविषयी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विचारले का ? असा अंतर्गत विरोध वाढत गेला तर सरकार टिकणार नाही आणि आम्ही सरकार स्थापन करणार नाही. तेव्हा मात्र फेरनिवडणूका होतील असे मला वाटते.