- नितीन अग्रवाल नवी दिल्ली - पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडूनउदयनराजे भोसले आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक उपस्थित होते. राज्यातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. त्यामध्ये भाजपाचे संजय काकडे, अमर साबळे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपाला केवळ दोन जागाच राखता येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्वाने उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अमर साबळे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे साबळे यांनी सांगितले आहे.
रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:53 PM