मेहनत घ्यावी लागणार : जळगावात आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणास लागणारजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषद व सद्यस्थितीला पाच पंचायत समिती ताब्यात असलेल्या भाजपाकडून जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपासाठी आगामी निवडणुकीत घोडदौड सुरु करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आजही पक्षाला जळगाव, पारोळा, भडगाव व चोपडा या चार तालुक्यांमध्ये अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. यशासाठी या तालुक्यांमध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्वाधिक पाच पंचायत समित्या भाजपाकडेजिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांपैकी मुक्ताईनगर, बोदवड , भुसावळ , अमळनेर व जामनेर या पाच पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर जळगाव, धरणगाव व एंडोल या तीन पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यावल व रावेर या दोन पंचायत समित्यांवर काँग्रेसचे तर चोपडा, पारोळा, पाचोरा व चाळीसगाव या चार पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस तर भडगाव पंचायत समितीवर अपक्ष सभापती आहेत.१५ पंचायत समित्यांमध्ये ४४ पंचायत समिती सदस्यविधानसभा, लोकसभा, जिल्हा बँक व जिल्हा दूध संघात भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने रणनिती आखली आहे. भाजपाचे १५ पंचायत समित्यांमध्ये तब्बल ४४ पं.स.सदस्यांचे संख्याबळ आहे. सर्वाधिक १० सदस्य जामनेरात आहे. त्यापाठोपाठ रावेर व मुक्ताईनगरात ६ तर अमळनेर व चाळीसगावमध्ये ५ सदस्य आहेत. चोपडा, एरंडोल, धरणगाव या ठिकाणी भाजपाचे अत्यल्प संख्याबळ आहे. जि.प.मध्ये २४ सदस्यांसह भाजपा मोठा पक्षजिल्हा परिषदेत २४ सदस्यांसह भाजपा हा मोठा पक्ष आहे. सर्वाधिक ६ जि.प.सदस्य हे जामनेर तालुक्यातून आहेत. तर चाळीसगाव व रावेर प्रत्येकी ४, अमळनेर ३, मुक्ताईनगर २ व एरंडोल, यावल, धरणगाव, बोदवड व भुसावळ प्रत्येकी १ जि.प.सदस्य आहेत. आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यामुळे त्यांचे समर्थक जि.प.सदस्य भाजपामध्ये दाखल झाले. मात्र जिल्हा बँक संचालक व अमळनेर बाजार समितीचे माजी सभापती अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम भाजपावर होण्याची शक्यता आहे.
भाजपा चार तालुक्यांमध्ये जोर देणार
By admin | Published: January 22, 2017 11:12 PM