२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 07:52 PM2018-09-03T19:52:29+5:302018-09-03T19:57:46+5:30

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल.

BJP will lost 2019 Election - Ashok Chavan | २०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात

२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात

 सातारा - केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीति संगम या समाधीस्थळी अभिवादन करून झाली. त्यानंतर जनसंघर्ष यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडली. 

रहिमतपूर येथे जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ''भाजप सरकारच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षात घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे या सरकारने काही केले नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करित आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरूण आत्महत्या करित आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरूण आत्महत्या करित आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. या सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. काँग्रेस पक्षाने सरकारच्या भ्रष्टाचारांची हांडी फोडली असून २०१९ च्या निवडणुकीत जनता या सरकारच्या पापाची हांडी फोडेल,'' असे  अशोक चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ''सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात. या सरकारची धोरणे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची नाहीत तर फक्त देशातल्या मुठभर उद्योगपतींच्या हिताची आहेत. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल,'' असे चव्हाण म्हणाले. 

Web Title: BJP will lost 2019 Election - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.