मुंबई - गेल्या महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला मात दिली. राज्यात सत्तांतर होऊन सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे भाजपामधील पक्षांतर्गत नाराजी आता समोर येऊ लागली आहे. एकनाथ खडसेंनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली. सरकार स्थापन होऊन आठवडा उलटल्यानंतर भाजपाच्या डझनभर आमदारांनी विद्यमान राज्यसभा खासदारासह पक्षाला सोडण्याची तयारी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना पक्षात सामील करुन घेतले होते. भाजपाची सत्ता येईल राज्यात येईल या आशेवर अनेक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाची मेगाभरती निवडणुकीच्या दरम्यान सर्वाधित चर्चेत होती. विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड, चित्रा वाघ अशा अनेक नेत्यांना भाजपाने पक्षात सहभागी करुन घेतले होते. मात्र राज्यात निकालानंतर घडलेल्या सत्तानाट्यात भाजपाची सत्ता गेली आणि यातील अनेकांचा हिरमोड झाला. भाजपातील काही आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. तर भाजपाची एकही आमदार फुटणार नाही, विरोधकांनाच भीती आहे की त्या तीन पक्षाचे आमदार सोबत राहतील का? यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा दावा भाजपाचे आशिष शेलार यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाचे अनेक आमदार नाराज असून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ तसेच आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी या आमदारांनी दाखविली आहे. मात्र या आमदारांबाबत महाविकास आघाडीने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर या आमदारांच्या स्वगृही परतण्याच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. खडसे आणि मुंडे समर्थक असलेले काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तसेच भाजपाचा एक राज्यसभेतील खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर हा खासदार राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचं सांगितले आहे.