मुंबई : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता येणे शक्य नाही. आघाडी, किंवा युती करुनच सत्ता स्थापन करावी लागेल. मात्र, असे असले तरी जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपा, शिवसेनेसोबत जाणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. शिवाय, काँग्रेसनेदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात संपादकीय विभागाशी त्यांनी संवाद साधला. नोटाबंदीमुळे सरकारच्या विरोधात कमालीचा रोष असून तो या निवडणुकीत व्यक्त होईल, असा दावाही तटकरे यांनी केला.शरद पवार यांची नरेंद्र मोदींशी असलेली मैत्री आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला देऊ केलेला पाठिंबा, यामुळे राष्ट्रवादीविषयी कायम संभ्रम राहतो. त्याचे काय?- १९९९ सालापासून आमच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे; पण त्या वेळी स्वतंत्र लढूनदेखील आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली. वस्तुत: आमच्यापुढे इतर पर्याय खुले होते. त्या वेळी जे घडले नाही ते आता कसे घडेल? गेल्या दोन वर्षात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या सरकारच्या विरोधात सगळ्यात जास्त भूमिका राष्ट्रवादीने घेतली, ३५ वर्षांनंतर शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरले. प्रदेश राष्ट्रवादीने राज्यभर जेलभरो आंदोलन केले, जर आमची भाजपाशी मैत्री असती, तर हे झाले असते का? शरद पवार यांना केवळ मोदीच नाही देशातले सगळे नेते मान देतात, हे त्यांचे कर्तृत्व आहे; पण बोलणाऱ्यांचे तोंड कसे बंद करणार? जे स्वत: काहीही करत नाहीत आणि दुसऱ्यांची वैगुण्ये दाखवतात.- नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीबाबत सकारात्मक असताना कोणाची अडचण आहे? - आम्ही सकारात्मक आहोत, असे बोलून प्रश्न सुटणार नाही. अशोक चव्हाण यांनी राज्य पातळीवरून आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली असती तर पुढे प्रश्नच उरला नसता; पण आता जिल्हा पातळीवर आघाडी करण्याची भूमिका घेतल्याने त्या त्या जिल्ह्यात जे ठरेल ते ठरेल... नांदेड, पुणे, ठाणे, सोलापूर, सांगली अशा अनेक जिल्ह्यांत आमची बोलणी चालू आहेत. आघाडीच्या विरोधाचा केंद्रबिंदू सातारा आहे. एवढेच मी म्हणेन...- आपला इशारा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे का?सर्वांनाच ते माहीत आहे. स्वच्छ प्रतिमेचा नारा देत ज्यांनी काँग्रेसला ४२ वर आणून ठेवले, त्यांनी दुसऱ्याच्या घराकडे बोट दाखवू नये.- राज्यातील सत्तांतराचे श्रेय नरेंद्र मोदींचे की पृथ्वीराज बाबांचे?- मला जे म्हणायचे ते मी बोललोच आहे...- मुंबईचे घोडे कोणामुळे अडले? इथे काय अडचण आहे?- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दोन महिनेआधी आघाडी करणार नाही, असे जाहीर करून टाकले. त्यानंतरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले; पण आमच्या यादी जाहीर करण्यावर अशोक चव्हाण नाराज झाले. याचा अर्थ निरुपम त्यांचे ऐकत नसावेत, किंवा जे काही घडले त्यापासून चव्हाण अनभिज्ञ असावेत अथवा त्यांचे मुंबई काँग्रेसमध्ये ऐकले जात नसावे. - विरोधी पक्षाची जागा शिवसेनेनेच भरून काढली आहे. तुमची काय भूमिका आहे? - शिवसेनेने विरोधकांची भूमिकादेखील बजावलेली नाही, तर ती त्यांची दुटप्पी भूमिका आहे. सत्तेत राहून सत्तेचे सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सरकारमधल्या मुख्य सहयोगी पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची किंवा नोटाबंदीला विरोध करायचा आणि केंद्रात मंत्रिपदही भूषवायचे हा दुट्टपीपणा आहे. राजकारणात हे फार काळ टिकत नाही. - पिंपरी-चिंचवडमधील तुमचे काही नेते भाजपात गेले, पुण्यात आघाडीत बिघाडी आहे, त्याचे काय?पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणार हे पक्के आहे. कारण अजित पवार यांनी तेथे प्रचंड काम केलेले आहे. नेते जरी गेले तरी जनता आमच्यासोबत आहे. पुण्यात काँग्रेसने ९१-७१ चा प्रस्ताव पाठवला आहे. तर आम्ही त्यांना ११६ जागा राष्ट्रवादीला आणि ४६ जागा काँग्रेसला असा प्रस्ताव पाठवला आहे; पण अशी पत्रापत्री करण्यापेक्षा समोरासमोर बसून चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे.-कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार?-मुद्दे खूप आहेत. भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर येऊन आता अडीच वर्षे झाली आहेत. सरकारविषयी शेतकरी, कष्टकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यात नोटाबंदीच्या निर्णयाची भर पडली आहे. नोटाबंदीमुळे कामगार वर्ग, शेतकरी देशोधडीला लागला आहे. या सर्व मुद्द्यांवर आम्ही सरकारचा पंचनामा करू. (शब्दांकन: अतुल कुलकर्णी)
भाजपा-सेनेसोबत कदापि जाणार नाही!
By admin | Published: January 19, 2017 12:07 AM