नाशिक - सध्या ज्या प्रकारे कारवाया सुरू आहेत ते पाहता अशाप्रकारचे राजकारण भविष्यात भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेले नसते. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या दुसरे सत्तेत आले तर तुम्ही काय कराल?. भारतात जे काही ईडी, सीबीआय सुरू आहे. मग इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी केले. परंतु त्यांनी केले म्हणून तुम्ही करायचे हे असं होत नसते असं सूतोवाच राज ठाकरे यांनी भाजपाबाबत केले आहेत.
नाशिकच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, मतदारांनी याबाबतीत निर्णय घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही. दहा चुकीच्या गोष्टीपासून दुर्लक्ष करायचे आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवर मतदान करायचे. त्यामुळे समोरचा पुन्हा दहा चुकीच्या गोष्टी करायला मोकळा होतो असं त्यांनी सांगितले. तसेच ईव्हीएमबाबतीत मी जेव्हा बोलत होतो तेव्हा कुणी मला साथ दिली नाही. आता तेच बोंबलतायेत, बोंबला असा टोलाही राज ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
तसेच जोपर्यंत मतदान होत नाही, तोपर्यंत जर तर याला अर्थ नाही. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. त्याला शाश्वत ठोकताळे नसतात. पुढे काही होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. जे मोठ्या प्रमाणात मतदान होते, बाबरीचा ढाचा पाडणे, दंगली, बॉम्बस्फोट, त्याकाळी झालेले मतदान एका रागातून झाले होते. तेव्हा काँग्रेस, इतर पक्षाचे मतदारसंघ होते त्याठिकाणीही भाजपा-शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. २०१४ मध्येही जे मतदान झाले ते एकप्रकारे रागातून झालेले मतदान होते. ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातून किती मतदान होते हे आपल्याला माहिती नाही. ही नवीन गोष्ट आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली, मात्र उत्तरांवर निवडणूक ही पहिलीच असेल. त्याचे मतदान कसे आणि काय होईल हे माहिती नाही. राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे परंतु मी भाजपाचा मतदार नव्हे असेही आहेत. १९९५ साली विधानसभेला महाराष्ट्रातील अनेक काँग्रेसच्या मतदारांनी दंगल आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाला मतदान केले होते. पण तेच मतदान १९९६, १९९७, १९९८ ला राहील असं काही नसते असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.