नाशिक : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्या भाजपने भारतीयांना दाखविलेले ‘बुरे दिन’ लवकर संपणारे नाहीत. माझ्यावर ज्यांनी देशद्रोहाचा आरोप लावला, त्यांनी सत्तेत आल्यानंतर निवडणूकीतील ‘अच्छे दिन’ व ‘विकास’ अशी दिलेली आश्वासने विसरून कोट्यवधी जनतेची दिशाभूल सत्ताधारी भाजपने केली तेच खरे देशद्रोही आहेत, असा सनसनीत टोला विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी नाशिकमध्ये आयोजित संविधान जागर सभेत लगावला. छात्रभारती, अेआयएसएफ, युवा परिषद, डीवायएफआय अशा विविध पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विद्यार्थी युवा संघटनांच्या वतीने नाशिकमधील मुंबईनाका येथील तुपसाखरे लॉन्स येथे संविधान सभा आयोजित केली होती. या सभेत ‘भारतीय विद्यार्थ्यांपुढील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया कु मार बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दत्ता ढगे, आयरा मालेगावकर, मिलिंद सावंत, प्रशांत निमसे, अॅड.राजपालसिंह राणा, प्रिया इंगळे, चेतन गांगुर्डे, विराज देवांग, विनय कटारे, सुवर्णा गागोडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कन्हैया म्हणाले, संपूर्ण भारतात ज्यांनी फुटकळ आश्वासने देऊन बहुमताने सत्ता मिळविली त्या सत्ताधारी पक्षाकडून माझ्यावर देशद्रोहाचे दोषारोपपत्र का दाखल केले जात नाही? असा खडा सवाल कन्हैया यांनी भाषणाच्या प्रारंभी उपस्थित केला. जनतेची दिशाभूल करणारे हे भाजपा सरकार भ्रष्टाचारी असो किंवा नसो मात्र बेईमान निश्चीतच आहे. या भाजपाने देशाला अच्छे दिन तर दाखविलेच नाही; मात्र नोटाबंदीपासून तर गॅस सबसिडीपर्यंत सर्वच स्तरावर घेतलेल्या निर्णयांच्या माध्यमातून ‘बुरे दिन’ भोगण्यास येथील गोरगरीब जनतेला भाग पाडले. देशाच्या वर्तमानातील समस्या जनतेने विसराव्या, यासाठी इतिहासामधील विविध कळीचे मुद्दे उकरून काढत त्यांच्या विपर्यास करून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न हे असमानतावादी भूमिका ठेवणारे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जे सरकार देशातील जनतेविरुध्द धोरणे आखून अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करते तेच खरे देशद्रोही आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. या देशात अन् शिवरायांच्या महाराष्टत आत्महत्त्या करण्याची वेळ ज्या शेतकर्यावर आली त्या शेतकर्याचे क र्ज माफ करण्यासाठी भाजपाकडे पैसा नाही, यापेक्षा मोठे दुर्देव या देशाचे अन् राज्याचे दुसरे कोणते असू शकेल? असा प्रश्न यावेळी कन्हैयाने उपस्थित केला.
कडेकोट बंदोबस्त अन् पोलिसांकडून अंगझडती
कन्हैया कुमार यांच्या सभेसाठी येणार्या प्रत्येकाची अंगझडती घेऊन पोलिसांकडून प्रवेश दिला जात होता. कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता शांततेत सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
कन्हैया यांच्या नाशिकच्या संविधान सभेतील भाषणातील मुद्दे
निवडणूकीत दिलेली आश्वासने सत्तेत न पाळणारे खरे देशद्रोही
भाजप भ्रष्टाचारी लोकांची पार्टी भाजपचे सरकार बेईमान ५६ इंच छाती असलेले लोक माझ्यावर दोषारोपपत्र का दाखल करत नाही?
वर्तमानातील समस्या जनतेने विसराव्या यासाठी इतिहास उक रला जात आहे. मोदी यांच्याविरुध्द माझी दुश्मनी नाही मात्र वैचारिक मतभेद आहेत.
मोदी यांनी जर तीन लाख कोटींचे काळे धन परत आणले तर मग बुलेट ट्रेनसाठी जापानकडून कर्ज घेण्याची वेळ का आली?
वाढत्या महागाईमुळे अच्छे दिन तर खूप लांब राहिले; मात्र ‘बुरे दिन’ देश अनुभवतोय. पीएम मोदी से सीएम मोदी तक आनंदी आनंद.
मोदी मन की बात करतील आम्ही संघर्षाची बात करु. बुरे दिन सहजासहजी संपणारे नाहीत.
ज्यांच्या पाठीवर ‘त्यांचा’ हात मग ते सर्वश्रेष्ठ श्रीमंत का होणार नाही? राजकारण पेशा होता कामा नये.
असमानतेचे राजकारण मनुवादी लोक करतात. देशाच्या एकात्मतेला बळकट करण्यासाठी संविधान बदलू पाहणार्या सत्ताधार्याना निवडणूकीत त्यांची जागा दाखवा.