Maharashtra Vidhan Sabha election 2024 : "भाग्यश्री ताई चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या वडिलांनी अंतर दिले असले, तरी शरद पवार साहेब तुम्हाला अंतर देणार नाही. ताकदीने पाठिंबा देतील, हा माझा विश्वास आहे", असे सांगतानाच जयंत पाटील यांनी दिल्लीतील सरकार घालवण्यासाठी भाजपला आणखी धक्का देण्याचे आवाहन केले. भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
अहेरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्र आणि भारतातील आदिवासींना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. लोकसभेसाठी जेव्हा भाजप तुमच्याकडे मते मागायला आला. तेव्हा तुम्ही त्यांचा कावा ओळखला. या देशात आदिवासींना पंडित नेहरूंपासून विकासासाठी जी संरक्षणे दिली गेली होती. ती आरक्षण असो वा अन्य. ती संरक्षणे काढून घेण्याचा विचार या भाजप करत आहे. या देशाची घटना बदलण्याचे पाप यांच्या मनात आहे. याची खात्री झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपचा पराभव केला."
विधानसभेला भाजपला धक्का द्यायचा आहे -जयंत पाटील
"नरेंद्र मोदींनी दिल्लीचे सरकार स्थापन केले. दोन राज्यातील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्याने. म्हणून आता विधानसभेत भाजपला आणखी एक धक्का द्यायचा आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात-मुंबईतील त्यांचे सरकार जात नाही, तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात विजयी करण्याची आपली जबाबदारी आहे", असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.
"...म्हणून भाग्यश्री आत्रामांचा पक्षप्रवेश लांबला", जयंत पाटलांनी सांगितले कारण
भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आपण विजयी केला. तो उमेदवार भाजपकडे निघालेला. आमच्या भाग्यश्री ताईंनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून मागे आणले आणि आपण त्यांना आमदार केले."
"बाबा मनाने कधीच तिकडे गेले होते. पण, त्यांची मुलगी कधीही भाजपच्या वळचणीला जाऊन बसली नाही. ती त्यांच्यापासून चार हात लांब राहिली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोकं फुटून तिकडे गेले, तेव्हापासून भाग्यश्री ताई आम्हाला आणि पवार साहेबांना सांगत होत्या की, जे चाललंय ते मला मान्य नाही. मला तुमच्याकडेच राहायचे आहे", असे पडद्यामागची गोष्ट जयंत पाटलांनी सांगितली.
जयंत पाटील म्हणाले, "आम्ही त्यांना सांगितले की, तुमचे वडील तिकडे गेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. पण, त्या म्हणाल्या मला तो मार्ग पसंत नाही. प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेल, पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे. आम्हीच चालढकल केली आणि दोन-चार महिने लांबवले. का, तर आम्हाला बघायचे होते की, भाग्यश्री ताई त्यांच्या विचारावर ठाम राहणार आहेत की नाही."