ऑनलाइन लोकमत शिर्डी, दि. 23 - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता कार्यकर्त्यांच्या ताकतीवर आमचा बालेकिल्ला परत खेचून आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे व आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांतही आम्ही क्रमांक एकवरच राहू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिका-यांच्या शिर्डी येथील बैठ्ठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, विजयकुमार रावल, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात पंधरा वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकत भाजपा सत्तेवर आला. गेल्या दोन वर्षात राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाचे चिन्ह सर्वदूर पोहोचले. भाजपाच्या ताकतीवर राज्यात परिवर्तन घडणार आहे. नगरपालिका व महानगरपालिकांमध्येही राज्यात मोठे परिवर्तन घडणार असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असेल. भाजपासोबत जे येतील त्यांना बरोबर घेवू. अन्यथा स्वबळावर लढून अव्वल स्थान मिळवू असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने पंधरा वर्षांतील भ्रष्ट कारभार बघितला आहे. आता आमचा अडीच वर्षांचा पारदर्शक कारभार जनतेपुढे आहे. एकत्रित बसून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. नगरपालिका निवडणुका जिंकण्याची खूणगाठ प्रत्येक लोकप्रतिनिधीने बांधावी. नाशिक पदवीधर मतदार संघ भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेचा आहे. विधानसभेत बहुमत असले तरी विधानपरिषदेत बहुमत नाही. त्यामुळे चांगले निर्णय घेण्यास विलंब लागतो. त्यासाठी नाशिक पदवधीर मतदार संघात भाजपाचाच उमेदवार निवडणून आला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही भाषण झाले. साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)---------स्थानिक निवडणुकीसाठी आघाडीचानिर्णय जिल्हा पातळीवरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. मित्रपक्षांबरोबर आघाडी करायची की नाही यासंबंधीचा निर्णय जिल्हापातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु मित्रपक्षाव्यतिरिक्त आघाडी करण्याबाबत प्रदेशाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकांतही भाजप अव्वल स्थानावरच राहील, मुख्यमंत्र्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 7:00 PM